नवी दिल्ली– केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी संचालकांचे चेअरमन म्हणून आज बैठक घेतली. नव्या आव्हानांवर मात करण्यासाठी वेळेवर, पुरेशा सहकार्याने आणि जागतिक समन्वयातून आपण पुढे आले पाहिजे, असे मत यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या 32 व्या कार्यक्रमाची तारीख, अर्थसंकल्प आणि प्रशासकीय समिती याबाबतचा निर्णय घेणे हा कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीचा उद्देश होता. ब्युरो कार्यकारी मंडळाच्या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक आणि कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष यांचा समावेश होता. डॉ. हर्षवर्धन यांनी पहिल्या बैठकीत सहभागी झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केले. कोरोना महामारीमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. तर कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योद्धांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.