बिलासपूर- पोटनिवडणूक तोंडावर असताना जनता काँग्रेस छत्तीसगड (जेसीसी(जे)) पक्षाला मोठा झटका बसला आहे. अमित जोगी आणि रिचा जोगी यांचे उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला आहे.
अमित जोगी आणि रिचा जोगी यांनी मारवाही मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, जात प्रमाणपत्राच्या कारणातून दोघांचेही उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आले आहे. राज्य स्तरीय चौकशी समितीने अमित जोगी यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले, तर मुंगेली जिल्हा स्तरीय अन्वेषण समितीने रिचा जोगी यांचे जात प्रमाणपत्र निलंबित केले होते. त्यानंतर रिचा जोगी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.
उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर अमित जोगी यांनी थेट बघेल सरकारला धारेवर धरले. देश हा कायदा आणि संविधानाच्या मार्गावर चालतो. बदलापूर आणि जोगेरिया येथून नाही. त्यांना असे वाटते की ते एकटेच ही निवडणूक लढणार आणि जिंकणार. पण, असे नाही. जनतेला मुर्ख आणि लाचार समजू नका, असे अमित जोगी म्हणाले.