नवी दिल्ली - भारतात कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. संचारबंदीमुळे सर्व नागरिक घरामध्ये कोंडले गेले आहेत. मात्र, 24 तारखेला लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशामध्ये घरगुती हिंसाचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे. काही हिंसाचाराच्या घटनांमध्ये पती पत्नीला कोव्हिड-19 म्हणून हिणवत असल्याचे समोर आले आहे, असे आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले.
24 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत महिला आयोगाकडे 69 तक्रारी आल्या असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. एक किंवा दोन तक्रारी रोज मला ई-मेलद्वारे येत आहेत. तसेच आयोगातील कर्मचाऱ्यांच्या ई-मेल आयडीवर, वैयक्तिक व्हॉट्सअॅप नंबरवर आणि कार्यालयाच्या क्रमांकावरही घरगुती हिंसाचारावर तक्रारी येत आहेत, असे शर्मा यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले.
संचारबंदीच्या काळात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांच्या तक्रारी येत आहेत. सगळीकडे बंद असल्यामुळे महिलांना पोलिसांकडेही मदतीसाठी जाता येत नाही. काही महिला पोलिसांकडेही जाण्यास तयार नाहीत. कारण दोन-तीन दिवसानंतर पती माघारी आल्यावर पुन्हा पत्नीवर अत्याचार करण्याची भीती महिलांमध्ये आहे. ही जरा वेगळीच अडचण आहे. संचारबंदी आधी नवरा बायकोत भांडण झाल्यावर महिला आपल्या आई-वडील किंवा नातेवाईकांकडे जाऊ शकत होती, मात्र, संचारबंदीमुळे तिला घराबाहेर पडता येत नाही, असे शर्मा म्हणाल्या.