नवी दिल्ली - रोहिणी परिसरातील ईएसआय रुग्णालयात डॉक्टरांसह रुग्णांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने डॉक्टरांना पीपीई कीट परिधान करून उपचार करावा लागतो. त्यातच आता रुग्णालयाच्या खोल्यातील एसी खराब झाला आहे. यामुळे रुग्णालयाबाहेर खाट टाकून डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत.
रोहिणी ईएसआय रुग्णालयाची दूरवस्था, डॉक्टरांसह रुग्णांचे हाल - Doctors treating patients outside the building
रोहिणी परिसरातील ईएसआय रुग्णालयात डॉक्टरांसह रुग्णांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयाच्या खोल्यातील एसी खराब झाल्यामुळे रुग्णालयाबाहेर खाट टाकून डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून डॉक्टर पीपीई किट परिधान करून 12 ते 14 तास काम करत आहोत. रुग्णालयात आराम करण्यासाठी तसेच जेवण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष नाहीत. रुग्णालयाची अवस्था खराब झाली आहे. आम्ही गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रशासनाकडे तक्रारी करत आहोत. मात्र, अद्याप आमच्या अडचणींवर तोडगा निघाला नाही, असे डॉक्टर शशांक यांनी सांगितले.
रुग्णालयातील डॉक्टर त्रासले आहेत. सध्या कोणताही मार्ग नसून आम्ही खुर्च्या आणि खाट आपत्कालीन वार्डाच्या बाहेर टाकले आहेत आणि तिथेच रुग्णांवर प्राथमिक उपचार करत आहोत, असेही एका डॉक्टरने सांगितले.