कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बिनशर्त माफी मागण्यास सांगितले आहे. याबरोबरच ४ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यासाठी ६ अटी ठेवल्या आहेत. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे राज्यातील आरोग्यसेवा खंडित झाली आहे.
ज्युनिअर डॉक्टरांच्या संयुक्त मंचचे प्रवक्ता डॉ. अरिंदम दत्ता, एसएसकेएम रुग्णालयात मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रकारे आम्हाला संबोधित केले. त्यासाठी आम्ही त्यांनी आमची बिनशर्त माफी मागावी. त्यांनी डॉक्टरांबद्दल असे बोलायला नको होते.
ममतांचे वक्तव्य
गुरुवारी एसएसकेएम रुग्णालायत बोलताना ममता म्हणाल्या, वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलनासाठी बाहेरुन लोक येते आहेत आणि वातावरण बिघडवत आहेत. हे आंदोलन माकप आणि भाजपचा कट आहे.
डॉक्टरांच्या अटी
१. ममतांनी जखमी डॉक्टरांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल निषेध जाहीर केला पाहिजे.
२. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वत: लवकरात लवकर हस्तक्षेप करावा.
३. सोमवारी रात्री डॉक्टरांना सुरक्षा पुरवताना पोलिसांच्या निष्क्रियेतेची न्यायालयीन चौकशी करावी.
४. हल्लेखोरांबद्दल केलेल्या कारवाईची पूर्ण माहिती द्यावी.
५. राज्यात ज्युनिअर डॉक्टर आणि विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.
६. सर्व वैद्यकीय महाविद्यालयात सशस्त्र बलाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
काय आहे प्रकरण?
कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यामुळे नाराज झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी २ ज्युनिअर डॉक्टरांना बेदम मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले होते.