महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोव्हॅक्सिन लस दिल्यानंतरही हरयाणाच्या मंत्र्याला कोरोनाची लागण, कारण...

हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांना कोरोनाची लागण झाली असून अंबाला येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. कोरोनाविरोधी लसीचा डोस दिल्यानंतरही त्यांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, यावर आता डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 5, 2020, 8:54 PM IST

हैदराबाद - हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांना कोरोनाची लागण झाली असून अंबाला येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोरोनाविरोधी लसीचा चाचणी टप्प्यातील डोस दिल्यानंतरही त्यांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, यावर आता डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिले आहे. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर पंधरा दिवसात तिचा प्रभाव दिसून येत नाही, असे अंबाला रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. कूलदीप सिंह यांनी सांगितले.

काय म्हणाले डॉक्टर?

लसीचा पहिला डोस दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत शरिरात अँटिबॉडीज (प्रतिजैवक) तयार होत नाही, असे सिंह यांनी सांगितले. अनिल वीज यांनी कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून नाव दिले होते. २० नोव्हेंबरला वीज यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. रक्तात कोरोनाविरोधी अँटिबॉडीज तयार होण्यासाठी कमीतकमी दोन लसीचे डोस घ्यावे लागतात, असे सिंह म्हणाले.

कोव्हॅक्सिन लस वीज यांना २० नोव्हेंबरला देण्यात आली होती. आता ५ डिसेंबर असून हा पंधरा दिवसांचा काळ आहे. कमीतकमी दोन डोस द्यायला हवेत. लस दिल्यानंतर सुमारे ४२ दिवसांनी मानवाच्या शरिरात योग्य रितीने अँटीबॉडीज तयार होतात. १८ डिसेंबरला वीज यांना लसीचा दुसरा डोस दिला जाणार होता. त्याला बुस्टर डोस असेही म्हटले जाते, असे सिंह यांनी सांगितले.

कोरोनाची लागण झाल्यानंतर वीज यांना संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला. मला कोरोनाची लागण झाली आहे. अंबाला कन्टोन्मेंट येथील रुग्णालयात मला दाखल करण्यात आले आहे, असे ट्विट वीज यांनी केले होते.

भारत बायोटेकचे स्पष्टीकरण

कोव्हॅक्सिन लस तयार केलेल्या भारत बायोटेक कंपनीनेही यावर स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर किमान १४ दिवसानंतर कार्यक्षमता ठरवता येते, असे कंपनीने म्हटले आहे. वीज यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिले. लसीच्या तीसऱ्या टप्प्यात २६ हजार स्वयंसेवकांना डोस देण्यात येणार आहे. २५ ठिकाणांवर ही चाचणी घेण्यात येणार आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details