नवी दिल्ली - पंतप्रधान आपत्कालीन निधीवरून काँग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदंबरम यांनी अनेक प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच आपले न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपले मत व्यक्त केले आहे. पीएम केअर फंडा बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अंतिम आहे, मात्र व्यावहारिक पातळीवर हा मुद्दा कितपत योग्य आहे. हा दीर्घकाळ चर्चेचा विषय ठरणार आहे, असे वक्तव्य त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर केले आहे.
पीएम केअर फंडाबाबत अशा अनेक गोष्टी आहेत, जसे की पारदर्शकता, व्यवस्थापन आणि स्पष्टीकरण या सारख्या अनेक बाबींवर न्यायालयास निकाल देण्याची संधी नव्हती असे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएम केअर फंडाबाबतची वैधता आणि कायदेशीर बाबींच्या अनुषंगाने हा निकाल दिला असल्याचेही चिदंबरम म्हणाले.
पीएम केअर फंडात निधी देणाऱ्यांमध्ये चिनी संस्थांचा सहभाग आहे का? -
मार्च महिन्यातील पहिल्या 5 दिवसांत पीएम केअर फंडामध्ये तब्बल 3 हजार 76 कोटी रुपयांचा निधी देणारे कोण लोक होते? त्यात चिनी संस्थांचा सहभाग आहे का? असे प्रश्नही चिदंबरम यांनी उपस्थित केले. तसेच त्यांनी 1 एप्रिलपासून जमा झालेल्या मदतनिधीबाबतही प्रश्न उपस्थित केला. या इतर सर्व बाबींवर न्यायालयाने स्पष्टीकरण दिले नसल्याचेही ते म्हणाले. तसेच पीएम केअर फंडात जमा झालेल्या निधीचे कोरोना निवारणासाठी ज्या प्रकारे निधी वाटप केला जातो, त्याची प्रक्रिया काय आहे. तसेच हा निधी घेणारे कोण आहेत असेही ते म्हणाले.
हा निधी वापरणाऱ्याकडून तो कोणत्या कामासाठी वापरला आणि कशा स्वरूपात खर्च केला याचे विवरण मागवले आहे का? तसेच माहिती अधिकारांतर्गत न येणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तरे कोण देणार असेही चिदंबरम म्हणाले