हैदराबाद - तेलंगाणा पोलिस मुख्यालयाबाहेर जंतूनाशक बोगदा (डिसइन्फेक्टंट टनेल) उभारण्यात आला आहे. यामुळे मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे. 'थ्री-व्ही सेफ टनेल' असे या मशीनचे नाव आहे.
एस३व्ही व्हेस्क्युलर टेक्नॉलॉजीस या कंपनीने हे मशीन तयार केले आहे. तेलंगणामध्ये अशा प्रकारचे हे पहिलेच यंत्र आहे. पोलीस महासंचालक महेंद्र रेड्डी यांनी या बोगद्यामधून चालत जाऊन याचे औपचारिक उद्घाटन केले.
वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टरांसोबतच पोलिसांचाही कोरोनाशी लढा देण्यामध्ये मोलाचे योगदान आहे. पोलिसही जिवावर खेळून नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचे यंत्र मुख्यालयात असणे आवश्यक आहे, असे मत या कंपनीच्या प्रवक्त्याने व्यक्त केले.
या मशीनच्या मदतीने केवळ २० सेकंदांमध्ये एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण निर्जंतुकीकरण शक्य आहे. यामध्ये निर्जंतुकीकरण करणाऱ्या रसायनाची फवारणी व्यक्तीवर करण्यात येते. मात्र याच्या थेंबांचा आकार १.५ ते २० मायक्रॉनपर्यंत असतो. तसेच यासोबतच पाण्यात विरघळणारे पॉलिमर आणि आयोडिनही मिसळण्यात येते.
हेही वाचा :'आज दिवा पेटवा; कोरोनाविरुद्धची लढाई १३० कोटी जनता लढणार'