नवी दिल्ली- वरिष्ठ काँग्रेस नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. शुक्रवारी सकाळी पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले होते. यावेळी बोलताना मोदींनी कोणतेही आर्थिक पॅकेज जाहीर केले नाही, हे निराशाजनक असल्याचे मत चिदंबरम यांनी व्यक्त केले.
देश सध्या मोठ्या संकटाला तोंड देतो आहे. अशावेळी गरीबांसाठी एखादे आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची अपेक्षा मोदींकडून होती. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी काही उपाययोजना जाहीर करण्याचीही मोदींकडून अपेक्षा होती. मात्र, या दोन्ही ठिकाणी देशातील नागरिकांच्या पदरी उपेक्षाच पडली आहे. प्रतीकांचा आदर करणे, त्यातून प्रेरणा देणे आवश्यक आहेच, मात्र गरीबांसाठी काही ठोस उपाययोजना करणेही आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ५ एप्रिलला घरात दिवे लावू. मात्र, त्याबदल्यात तुम्हीही कृपया आमचे, देशातील विशेषज्ञांचे आणि अर्थतज्ज्ञांचे म्हणणे ऐका, अशी विनंती चिदंबरम यांनी पंतप्रधानांना केली आहे. ते पुढे म्हणाले, की २५ मार्चला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्या गरीबांना आर्थिक मदतीपासून वगळले, त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी घोषणा कराल अशी आमची अपेक्षा होती.
कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. यावेळी त्यांनी लॉकडाऊनला समर्थन दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. 'रविवारी सर्वांनी एकत्र येत रात्री 9 वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा आणि मेणबत्ती लावा, असे अवाहन मोदींनी केले आहे.
हेही वाचा :COVID-19 : पंतप्रधान सहाय्य निधीसाठी इस्रोनेही दिली मदत!