नवी दिल्ली - देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. त्यावरून भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक राज्यात आम्ही नागरिकत्व सुधारणा कायदाविरोधी आंदोलकांना कुत्र्यासारखे मारले, असे दिलीप घोष म्हणाले.
'नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलकांनी राज्यातील सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान केले आहे. हे लोक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मतदार आहेत. त्यामुळे दीदी (ममता बॅनर्जी) त्यांच्याविरूद्ध कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाहीत. मात्र, भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक राज्यात आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलकांना कुत्र्यासारखे मारले आहे', असे घोष म्हणाले. तुम्ही येथे येता, राहता, खाता आणि येथील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करता. हीच का तुमची जमीनदारी? असा सवाल घोष यांनी केला. तसेच येथील मालमत्तेचे नुकसान केल्यास आम्ही तुम्हाला मारू आणि तुरुंगात टाकू, असेही ते म्हणाले. नागरिक्तव सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी आंदोलकांनी अनेक भागांमध्ये बस, रेल्वेगाड्यांना आगी लावल्या होत्या. बंगालमधील बेलदंगा रेल्वे स्थानकाला आंदोलकांनी पेटवले होते. त्यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसला हावडामधील उलुबेरिया स्थानकाजवळच थांबवण्यात आली होती. तर, दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना राज्यात तोडफोड केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला होता.