भोपाळ - काँग्रेस आमदार लक्ष्मण सिंह यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, की आता हे विधेयक मंजूर होऊन, त्याचा कायदा झाला आहे. त्यामुळे देशातील कोणताही प्रदेश हा त्याला लागू करण्यास मनाई करू शकत नाही. तसेच त्यांनी आयफा सोहळ्याबाबतही वक्तव्य केले आहे. ते इंदूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
सीएए बाबत बोलताना सिंह म्हणाले, की मंजूर झालेला कायदा बदलण्यासाठी बहुमताची गरज असते. जर बहुमत नसेल, तर आपल्याला तो कायदा मान्य करावा लागेल. ते पुढे म्हणाले, की मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ या कायद्याच्या विरोधात आहेत, मात्र लोकांमधील एक मोठा वर्ग हेही म्हणत आहे, की हा कायदा लागू करण्यात यावा. या कायद्यामध्ये केवळ एवढाच बदल केला आहे, की पूर्वी नागरिकता मिळवण्यासाठी ११ वर्षे भारतात राहण्याची अट होती, ती आता चार वर्षांवर आणली आहे असेही ते यावेळी म्हणाले.