नवी दिल्ली -वरिष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी बुधवारी मोदी सरकारवर हल्ला चढवला. 'देशातील गंभीर मंदीचा मोदी सरकारला पत्ताच नाही,' असे सिंह यांनी म्हटले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला वित्तीय तुटीतून बाहेर पडण्यासाठी १.७६ लाख कोटींची निधी दिला. यानंतर सिंह यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.
'अशा प्रकारचे निर्णय रिझर्व्ह बँकेकडून घेतले जात आहेत. त्याच वेळी बँकेच्या गव्हर्नरपदी अर्थतज्ज्ञ नसून मोदी सरकारपुढे वाकणारा उचलून बसवलेला सरकारी नोकरदार आहे. आता देवानेच भारताच्या अर्थव्यवस्थेला वाचवावे. मोदी सरकारला पत्ताही नाही देशात किती गंभीर मंदी आली आहे. आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत. अराजकाच्या?' असा सवाल सिंह यांनी द्विटद्वारे केला आहे.
सरकारला १.७६ लाख कोटी रुपयांचा निधी देण्याच्या बँकेच्या निर्णयानंतर काँग्रेसने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यावरही जोरदार टीका केली होती. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना आरबीआयच्या या मोठ्या निर्णयानंतर टीका केली होती. बँकेजवळचा राखीव निधी सरकारला पाठवण्याचा निर्णय अत्यंत भयंकर स्थितीचे सूचक आहे, असे त्यांनी म्हटले होते.