नवी दिल्ली - व्हॉट्सअॅपवर भारतीय नागरिकांचे व्यक्तिगत स्वातंत्र्याचे उल्लघंन केल्यासंबधी काही माहिती समोर आली होती. या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेमध्ये भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या नेत्यांना हेरगिरीविषयी पूर्ण माहिती होती. त्यांनी बेकायदेशीररित्या स्पायवेअर पिगाससचा वापर केला, असे सिंह म्हणाले.
गृहमंत्री अमित शाह यांनी काही महिन्यांपूर्वी फेसबुकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. सरकारने पिगाससची खरेदी करून बेकायदेशीरपणे त्याचा वापर केला, अशी टीका सिंह यांनी भाजपवर केली.
सिंह यांनी सर्व पक्षांना संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करून मूलभूत हक्कांशी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असणाऱ्या या संवेदनशील विषयाची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण?
इस्रायलच्या स्पायवेअर पिगासस भारतामध्ये सक्रिय होता. इस्राईलमधील एनएसओ ग्रुपने तंत्रज्ञानाचा वापर करत जगभरातील १ हजार ४०० लोकांच्या स्मार्टफोनला लक्ष्य केल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले होते. यामध्ये राजकीय विरोधक, पत्रकार आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र, यामध्ये कोणत्या पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा समावेश हे कंपनीने जाहीर केले नव्हते.