भोपाळ -भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 'टायगर अभी जिंदा है' असे वक्तव्य नुकतेच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आव्हान देताना केले होते. त्यावर ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
वाघाचे वैशिष्ट्य माहीती आहे का? जंगलामध्ये फक्त एकच वाघ राहतो, असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले. मध्यप्रदेश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. सिंधियांबरोबर काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या तब्बल 12 आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पत्रकारांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांना विचारण्यात आले की, काँग्रेस नेते भाजपात गेलेल्या आमदारांची आणि तुमची प्रतिमा मलिन करत आहेत. त्यावर ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, मी काँग्रेस पक्षाला नक्कीच उत्तर देईल. मात्र, दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांना मला एक सांगायचेय, की टायगर अभी जिंदा है. त्याला दिग्विजय सिंह यांनी उत्तर दिले आहे. वाघाचे वैशिष्ट्य माहीती आहे का? जंगलामध्ये फक्त एकच वाघ राहतो, असे ट्विट त्यांनी केले.
ज्योतिरादित्य सिंधिया आणि समर्थक आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेस शासित कमलनाथ सरकार कोसळले. काँग्रेस नेते सिंधिया आणि पक्ष बदलणाऱ्या आमदारांना लक्ष्य करत आहेत.