तिरुवअनंतपुरम : केरळमधील शबरीमला मंदिर तब्बल सहा महिन्यांनी पुन्हा भाविकांसाठी खुले होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वीच हे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. यानंतर आता शनिवार (१७ ऑक्टोबर)पासून हे मंदिर पुन्हा उघडण्यात येणार आहे. पाच दिवसांसाठी हे मंदिर उघडण्यात येणार आहे.
शबरीमला मंदिराची देखरेख करणाऱ्या त्रावणकोर देवासोम बोर्डने याबाबत माहिती दिली. शुक्रवारी सायंकाळी हे मंदिर उघडण्यात येणार आहे. मात्र, भाविकांसाठी हे शनिवारी पहाटे पाच वाजेपासून खुले होईल. मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली नियमावली पाळणे बंधनकारक असणार आहे.
भाविकांना आपण कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच आत प्रवेश मिळेल. यासाठी ४८ तासांपूर्वीपर्यंत केलेली कोरोना चाचणी ग्राह्य धरण्यात येईल. याठिकाणी गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्यास मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच, ठिकठिकाणी पोलीसही तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली.
याठिकाणी केवळ १० ते ६० वर्षापर्यंतच्या भाविकांनाच प्रवेश देण्यता येईल. तसेच, भाविकांनी मास्क, सॅनिटायझर आणि हातमोजे वापरणे बंधनकारक असणार आहे. वडास्सेरीकारा वगळता शबरीमला मंदिराकडे जाणारे इतर रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच नजीकच्या रुग्णालयांमध्ये अतिरिक्त वैद्यकीय आणि पॅरामेडिकल पथके तैनात करण्यात आली आहेत.
हेही वाचा :‘मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार!’, भाविकांच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा