अमरावती -आज (गुरुवार) सूर्यग्रहणानिमित्त देशभरातील मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, आंध्रप्रदेशमधील एक मंदिर याला अपवाद आहे. चित्तोर जिल्ह्यातील 'श्रीकालहस्ती देवस्थान' हे सूर्यग्रहणाच्या दरम्यानही खुले ठेवण्यात आले आहे. या मंदिरात राहू आणि केतू यांची पूजा करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
सूर्यग्रहणादरम्यान राहू आणि केतूची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीमधील दोष दूर होतो, अशी श्रद्धा या भाविकांची आहे. या मंदिरातील शंकराच्या कवचामध्ये सर्व २७ तारे आणि नऊ राशी आहेत. त्यामुळे येथील महादेव हा संपूर्ण सूर्यमाला आपल्या ताब्यात ठेवतो, अशी अख्यायिका आहे. आणखी एका अख्यायिकेनुसार ग्रहणादरम्यान, राहू आणि केतू हे चंद्र-सूर्याला गिळत असतात. त्यामुळेच या मंदिरात ग्रहणादरम्यान राहू आणि केतूची पूजा केली जाते. म्हणूनच, कोणत्याही ग्रहणादरम्यान, जेव्हा भारतातील सर्व मंदिरे बंद असतात, तेव्हा केवळ हे मंदिर खुले ठेवण्यात येते.