बंगळुरु - जनता दलाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी रविवारी राज्यसभा निवडणूक लढण्यासंदर्भात मोठे विधान केले. 'मला राज्यसभेवर जाण्याच काहीच रस नाही. यापूर्वीच मी निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले होते', असे देवेगौडा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
'मला राज्यसभेत जाण्यामध्ये काहीच रस नाही. पक्षाला आणखी मजबूत करण्यावर मला भर द्यायचा आहे. निवडणूक लढणार नसल्याचं मी यापुर्वीच सांगितले होते', असे देवेगौडा म्हणाले.
दरम्यान यावर्षी जूनमध्ये राज्यसभेतील 4 जागा रिक्त होणार आहेत. काँग्रेसचे राजीव गौडा आणि बी.के. हरी प्रसाद तर भाजपचे प्रभाकर कोरे आणि जेडीएसचे कुपेन्द्र रेड्डी यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. त्यामुळे देवगौडा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. देवगौडा यांच्या स्पष्टीकरणामुळे या चर्चावर पडदा पडला आहे.
देवेगौडा यांनी आपला पारंपारिक मतदारसंघ आपला नातू प्रज्वल रेवाण्णा यांना लोकसभा निवडणुकांसाठी मोकळा करुन दिला होता. तर गौडा यांनी तुमकुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता.