नवी दिल्ली -भरपूर गाजावाजा करत पार पडलेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमानंतर भारत-अमेरिका संबंध सुधारले असल्याचे सांगितले जात होते. मात्र, भारतीयांना अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एच-१बी व्हिसांना नाकारण्याचे प्रमाण हे या कार्यक्रमानंतर अधिकच वाढले आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांचा सामान्य भारतीयांना नेमका काय फायदा होतो आहे? असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे.
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमेरिकेतील भारतीयांशी संवाद साधला होता. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थित होते. गेल्या महिनाभरात भारतीय आयटी कंपन्यांमधील, अमेरिकेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांना एच-१बी हा व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे.