श्रीनगर -पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी काश्मीर खोऱ्यात भारताच्या वतीने तयारी केली जात आहे. या शुद्ध थापा आहेत! हो, अशा प्रकारची कोणतीच तयारी भारताने केलेली नाही. काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या १०० तुकड्या या वेगळ्याच कारणासाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे, अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांपासून सावध राहण्याचा इशारा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिला आहे.
पाकिस्तानला धडा -
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतभर संतापाची लाट पसरलेली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत राजकीय स्तरावर प्रयत्नही करत आहे. पाकिस्तानचा विशेष देशाचा दर्जा काढून टाकण्यापासून तर सिंधू नदीचे पाणी अडवण्यापर्यंतची तयारी भारताने दर्शवली आहे. त्यातल्या त्यात अनेक देशांनी या हल्ल्याविरोधात निषेध नोंदवला आहे. यातच अफवांच्या बातम्यांना उधाण आलेले दिसते.
या आहेत अफवा -
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या वतीने काश्मीर खोऱ्यात विशेष हालचाली होत आहेत. त्यासाठी १०० पेक्षा अधिक निमलष्करी दलाच्या तुकड्या भारताने काश्मीरच्या सीमेवर तैनात केल्या आहेत. तर, सामान्य नागरिकांना एका मर्यादेतच इंधन पुरवले जाणार आहे. तसेच काही गावांना खाली करण्याचा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे, अशा बातम्या समोर येत आहे. या बातम्या खोट्या असून काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झालेली नाही. याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः राज्यपालांना पत्रकार परिषद घ्यावी लागली.