11.40 AM : दिल्ली विमानतळावरील १६ विमानांचे मार्ग बदलले, चार विमाने रद्द
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये थंडीने कहर केला आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजून गेले, तरी शहरात ठिकठिकाणी धुक्याचा जाड थर पसरलेला आहे. दृश्यमानता कमी असल्यामुळे उत्तर रेल्वेच्या किमान ३० गाड्या उशिराने धावत आहेत, तर काही विमानांचे मार्गही दुसरीकडे वळविण्यात आले आहेत. दिल्ली विमानतळावरील साध्या विमानसेवा ठप्प करण्यात आल्या आहेत. केवळ कॅट-३-बी (इंस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम) प्रकारचे विमानचालकांनाच लँडिंगची परवानगी देण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये धुक्याचा थर, विमान आणि रेल्वेसेवांवर परिणाम.. दिल्लीच्या सफदरजंगमध्ये किमान तापमान २.६ अंश सेल्सिअस आहे. पालममध्ये २.९ अंश सेल्सिअस, लोधी रोडला २.२ अंश सेल्सिअस, आया नगरला २.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर दिल्लीमध्ये पहाटे सरासरी २.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी भारतीय हवामान विभागाने दिल्लीतील तापमान पाहता, शनिवारी 'रेड अलर्ट' जारी केला होता. तसेच ३१ डिसेंबरनंतर दिल्लीसह नोएडा, गुरूग्राम, गाझियाबाद आणि फरीदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये धुक्यामुळे झालेल्या अपघातात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ११ जणांना घेऊन जाणारी अर्टिगा गाडी ही धुक्यामुळे रस्ता न दिसल्याने कालव्यात जाऊन पडली. रविवारी रात्री झालेल्या या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा : धुक्यामुळे कालव्यात पडली कार, दोन अल्पवयीन मुलांसह सहा ठार