जयपूर (राजस्थान)- राज्यसभेच्या निवडणुका दोन महिन्याअगोदरही घेता येऊ शकल्या असत्या. मात्र, कोणत्याही कारणाशिवाय त्या पुढे ढकलण्यात आल्या. कारण, भाजपची त्यावेळी घोडेबाजाराची तयारी पूर्ण झाली नव्हती. देश कोरोना विषाणूशी लढत असताना पंतप्रधान आणि गृहमंत्री लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहेत. एकाधिकारशाही प्रस्थापित करण्याच्या भाजपच्या धोरणाने लोकशाही धोक्यात आली आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले.
राजस्थान काँग्रेसकडून भाजपवर आमदारांचा घोडेबाजार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देशातील लोकशाही नष्ट करत आहेत. लोकांनी केंद्र सरकारला याचा जाब विचारायला हवा. भाजप आमचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे गेहलोत म्हणाले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि इतर काँग्रेस नेत्यांसोबत जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.