पंचकुला (हरयाणा) -पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे संस्थापक रामदेवबाबा व त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 आणि साथीचे रोग कायदा, 1897 नुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयातील वकील सुखविंद्र सिंह नारा यांनी हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित रामदेवबाबा, आचार्य बालकृष्ण आणि त्यांची कंपनी पतंजली यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची विनंती केली आहे.
पतंजली कंपनी, रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनील तसेच श्वासारी औषधाबाबत मंगळवारी (दि.23 जून) पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग कायद्याचे उल्लंघन करत सामाजिक अंतराचा फज्जा उडविला होता. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
तसेच, त्यांनी कोरोनावर हे औषध असल्याचा दावा केला होता. पण, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या औषधासंदर्भात नेमक्या कोणत्या चाचण्या घेण्यात आल्या? कशाच्या आधारे या औषधाचे संशोधन झाले? संशोधन, चाचण्या झाले असतील तर, त्याबाबत यापूर्वी कोणाला माहिती दिली होती? आयसीएमआर व आयुष मंत्रालयाकडून या औषधनिर्मिती तसेच विक्रीची परवानगी पतंजलीला मिळाली आहे का, अशा विविध प्रश्न सुखविंद्र सिंह यांनी उपस्थित केले आहेत. यामुळे जोपर्यंत पतंजलीच्या या औषधाला शासनमान्यता मिळत नाही. तोपर्यंत कोणीही ते औषध घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.