नवी दिल्ली - उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात आज निकाल जाहीर होणार आहे. गुरुवारी न्यायालयाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. आज दुपारी तीन वाजता तो जाहीर होणार आहे. माजी भाजप आमदार कुलदीप सेनगर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे, त्याला शिक्षा होणार की नाही याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण..?
जून २०१७ मध्ये नोकरी मागण्यास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर कुलदीप सेनगर याने लैंगिक अत्याचार केला, असा आरोप तिने केला आहे. तेव्हापासून पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय न्यायासाठी लढत आहेत. त्यानंतर, सेनगर आणि त्याच्या माणसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील येत असल्याचा आरोप तरुणीने केला होता. त्यातच २८ जुलै रोजी रायबरेलीवरून माघारी येत असताना पीडितेच्या कारचा आणि ट्रकचा अपघात झाला. हा अपघात नसून कुलदीप सेनगर यांनी घातपात केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर पीडिता आणि तिचे वकील थोडक्यात बचावले होते.