नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत सध्या कोरोनाची तिसरी लाट आली आहे. नवे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच दिवाळीत फटाक्यांमुळे हवाप्रदुषणात वाढ होण्याचा प्रश्न दरवर्षीचाच आहे. मात्र, यावर्षी सरकारने कोरोनाची स्थिती लक्षात घेता फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाके बंदीमुळे यावर्षी दिल्लीत मागील चार वर्षाच्या तुलनेत सर्वात कमी प्रदूषण राहणार असल्याचा दावा अर्थ सायन्स (भू-विज्ञान) मंत्रालयाने केला आहे. २.५ पर्यंतचे सर्वात जास्त घातक प्रदुषणाचे कण हवेत कमी प्रमाणात राहणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा -प्रदुषणाविरोधात लढण्याकरता मोहरीचे तेल नाकाला लावा - आयएमडीच्या अधिकाऱ्याचा सल्ला
केंद्रीय हरित लवादाने दिल्लीत ३० नोव्हेंबरपर्यंत फटाके वाजविण्यासोबत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ९ नोव्हेंबरला लवादाने हा निर्णय घेतला. चालू महिन्यात ज्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये हवेचा स्तर खराब किंवा अती खराब झाला असेल तेथेही हा निर्णय लागू राहणार आहे.
मागील वर्षी फसलेला उपक्रम
मागीलवर्षी दिवाळीच्या काळात दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने अभिनव उपक्रम राबवला होता. नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा म्हणून नागरी भागांत 'लेझर शो'चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. २०१८ पेक्षा हवेचा स्तर जास्त खालावला होता. यावर्षी कोरोनाचा प्रसार लक्षात घेता सरकार सावधगिरीने पावले उचलत आहे.
हेही वाचा -जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांपैकी सहा भारतातील!
पंजाब, हरयाणा दिल्लीच्या प्रदुषणास जबाबदार
शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १७ नोव्हेंबरपर्यंत शहरात खडी बारीक करण्याची यंत्रे आणि हॉट मिक्स प्लांटच्या वापरावर बंदी घातली आहे. अतिप्रदुषणामुळे कोरोनाचा धोका अधिक असल्याने सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. दिल्लीशेजारील पंजाब आणि हरयाणा राज्यात शेतकरी पिकाची कापणी झाल्यानंतर राहिलेला कचरा पेटवून देतात. त्यामुळे दिल्लीच्या प्रदुषणात भर पडली आहे. यावर दोन्ही राज्यांनी कडक निर्बंध घालावेत, असे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत.