नवी दिल्ली -राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारादरम्यान नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. भाजप खासदार परवेश वर्मा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले आहे. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला. 'मी दहशतवादी वाटतो, की तुमचा मुलगा हे दिल्लीकरांनीच ठरवावं', असे केजरीवाल म्हणाले.
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेणारा, शिक्षण आणि आरोग्यासंबधीत उपाययोजना करणारा आणि वृद्धांना तीर्थयात्रेवर पाठवणारा दहशतवादी असतो का, असा सवाल त्यांनी केला. तसेच मी खरगपूर आयआयटी येथून शिक्षण घेतले आहे. मी विदेशातही जाऊ शकलो असतो. मात्र, मी देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढा दिला, असे केजरीवाल म्हणाले.