नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ताहिर हुसेनच्या तीन सहकाऱ्यांना अटक केली आहे. २४ फेब्रुवारीला झालेल्या दंगलीवेळी ताहिर हुसेन याच्या घराजवळ उपस्थित असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. इरशाद, आबिद आणि शादाब अशी तिघांची नावे आहेत.
तिघेही मुस्तफाबाद येथील रहिवासी आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विशेष पथक या प्रकरणी तपास करत आहेत. दंगली वेळी ताहिर हुसेन याच्या घरावर पोलिसांना पट्रोल बॉम्ब आणि इतर साहित्य आढळून आले होते. तसेच गुप्तचर विभागातील अंकित शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप ताहिर हुसेनवर आहे.
काल विशेष तपास पथकाने ताहिर हुसेनच्या नातेवाईकांची आणि कुटुंबियांची चौकशी केली होती. ताहिरच्या भावालाही ताब्यात घेतले होते. हिंसा झाली त्या दिवशी हुसेन कोणाबरोबर फोनवर बोलला याची रेकॉर्डींगही पोलीस तपासत आहेत. त्यातून हाती आलेल्या माहितीतून पोलिसांनी आज तिघांना अटक केली.
ताहिस हुसेन हा आपचा नगरसेवक होता. मात्र, दिल्ली हिंसाचारात नाव आल्याने त्याला पक्षाने निलंबित केले आहे. घराच्या छतावर हल्ल्याचे आक्षेपार्ह साहित्य सापडल्याने ताहिर हुसेन फरार झाला होता. नंतर त्याने न्यायालयात आत्मसमर्पन केले होते. मात्र, न्यायालयाने आत्मसमर्पन स्वीकारले नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनही स्वीकारला नव्हता.