नवी दिल्ली - दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (CAA) सुरू असलेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ही बैठक तीन तास चालली. दरम्यान, शाह यांची मागील 24 तासातील ही तिसरी बैठक आहे.
दिल्लीतील परिस्थिती पाहता अमित शाह यांनी तिरुवनंतपूरमचा दौरा रद्द केला आणि तातडीने दिल्लीतील परिस्थितीबाबत पोलीस प्रशासनासोबत बैठक घेतली. या बैठकीला दिल्लीचे नवनियुक्त विशेष पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांच्यासह दिल्ली पोलिसमधील वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून ईशान्य दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 170 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. एक पोलीस हेड कॉन्स्टेबलसह बारा नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. हिंसाचारामुळे ईशान्य दिल्लीतील शाळा, कॉलेज उद्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर सीबीएसईने या भागातील 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच जाफराबाद, बाबरपुरी, गोकुलपुरी, जौहरी एनक्लेव्ह आणि शिव विहार येथील मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले आहेत.