नवी दिल्ली - दिल्ली सरकारने गुरुवारी राजधानीतील कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका असलेल्या हॉटस्पॉटची नवी यादी जाहीर केली. आता ही यादी 25 वर गेली आहे. म्हणजेच, दिल्लीमध्ये सध्या कोविड-19 सर्वाधिक धोका असलेली 25 ठिकाणे आहेत. याआधी बुधवारी 20 हॉटस्पॉटची यादी जाहीर केली होती.
बुधवारी रात्री तीन नवे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर बंगाली मार्केटला हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट करण्यात आले. यासह जे. जे. कॉलनीतील शास्त्री मार्केट, सदर बाजार, B1 आणि B2 ब्लॉक, पश्चिम विहारमधील काही भाग, निजामुद्दीन दर्गाह आणि निजामुद्दीन बस्ती हे हॉटस्पॉट नव्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व नागरिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यामध्ये त्यांनी कोविड-19 या महामारीशी लढण्यासाठी सरकार उचलत असलेली पावले आणि लोकांनी घ्यावयाची खबरदारी याविषयी माहिती दिली. त्यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना मास्क वापरण्याचे आणि विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन केले.