नवी दिल्ली - हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीत जनजीवन पूर्व पदावर येत आहे. मागील ३६ तासांत कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही. यामुळे शुक्रवारी सकाळी १० वाजेनंतर जमावबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार असल्याचे गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने ईशान्य दिल्लीतील परिस्थिती हाताळण्यासाठी जमावबंदी केली. तसेच दंगेखोरांना पाहताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हिंसाचारग्रस्त परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. यामुळे काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आली. आतापर्यंत हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ४८ एफआयआर दाखल केल्या आहेत. तसेच पोलिसांनी ५१४ जणांना ताब्यात घेतले आहे. चौकशी नंतर त्यांना अटकही होऊ शकते.