नवी दिल्ली -जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. तर दिल्ली पोलिसांनी याला विद्यार्थांनाच जबाबदार धरले आहे.
आंदोलकांनी पोलिसांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी संयम बाळगला. या चकमकीत 30 जवान जखमी झाले असून 1 जण आयसीयूमध्ये असल्याचे दिल्ली पोलीस जनसंपर्क अधिकारी एम.एस. रंधावा यांनी सांगितले.रविवारी दुपारी 2 च्या सुमारास आंदोलन सुरू झाले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आंदोलनकर्ते माता मंदिर मार्गाकडे गेले जेथे त्यांनी बसला आग लावली. , या प्रकरणात सामील झालेल्या लोकांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी नागरिक्तव सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. काल रविवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड झाली. आंदोलक विद्यार्थ्यांनी ही तोडफोड केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तर, पोलिसांनी स्वतःच आग लावल्याचे आणि तोडफोड केलेले विवादास्पद व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरले आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी विनापरवानगी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थी संघटना करत आहेत. पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.