नवी दिल्ली - दिल्लीतील वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी संसदेच्या स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला अनेक सदस्य उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे नाईलाजाने ही बैठक रद्द करण्यात आली.
दिल्लीतील प्रदूषणासाठी सर्वोच्च न्यायालयाने विविध सरकारी संस्थांना धारेवर धरले आहे. मात्र, या संस्थांचे पदाधिकारीही या बैठकीला अनुपस्थितीत होते. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला बोलावण्यात आलेल्या २९ निमंत्रितांपैकी केवळ चार खासदार उपस्थित होते. तर अनुपस्थितांमध्ये पर्यावरण विभाग सचिव, वन विभाग सचिव, पर्यावरण बदलांसंबंधी विभागाचे सचिव, दिल्ली विकास संचलनालयाचे प्रतिनिधी आणि दिल्ली महानगरपालिकेचे तीन मुख्य अधिकारी या महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश होता.
जगदंबिका पाल, हुस्सैन मसूदी, सी. आर. पाटील आणि संजय सिंघ हे चार खासदार या बैठकीसाठी उपस्थित होते. अपुऱ्या उपस्थितीमुळे ही बैठक रद्द करण्यात आली.
केजरीवालांवर टीका करणारा खासदार गौतम गंभीरही अनुपस्थित...
दिल्लीमधील वायुप्रदुषणाबाबत गौतम गंभीर याने ट्विट करत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. एकमेकांची पाठ थोपटत, निवडणुकीसाठी तयारी करण्यापेक्षा दिल्ली सरकारने गेल्या साडेचार वर्षांमध्ये प्रदूषणाशी लढा देण्यासाठी काय केले, हे आम्हाला सांगावे, असे मी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आव्हान देतो. अशा आशयाचे ट्विट त्याने केले होते.