नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील एकूण कोरोना 'पॉझिटिव्ह' रुग्णांपैकी 68 टक्क्यांहून अधिक रुग्ण 'मरकज' कार्यक्रमात उपस्थित राहिले असल्याची आकडेवारी समोर आली आहे. दिल्लीत मागील चोवीस तासांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले केवळ 17 रुग्ण सापडले आहेत आणि दोन मृत्यू झाले आहेत.
दिल्लीतील एकूण कोरोना बाधितांच्या आकडा 1578 वर पोहोचला आहे. यापैकी 1080 रुग्ण असे आहेत, जे मरकजमधील कार्यक्रमात उपस्थित होते, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी गुरुवारी सांगितले.
सध्या 1578 रुग्णांपैकी 867 लोक रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी 29 जण अतिदक्षता विभागात, 5 जण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत, तर 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रुग्ण सापडत असलेल्या परिसराला हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात येत आहे. अशा ठिकाणांची संख्या वाढत आहे, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, देशभरात एकूण 12 हजार 380 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून, यांपैकी 10 हजार 477 अॅक्टिव्ह केसेस आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी 1 हजार 489 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर, 414 जणांचा यात बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.