नवी दिल्ली -देशभरामध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने पसरला असून आतापर्यंत 1 हजार 251 कोरोनाची लागण झाली आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संसर्गाचा धोका असल्याची भीती कर्मचारी राहत असलेल्या घरमालक आणि सोसायटीतील रहिवाशांमध्ये पसरली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना घर खाली करायला सांगणाऱ्या मालकांवर दिल्ली प्रशासन करणार कारवाई
आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संसर्गाचा धोका असल्याची भीती कर्मचारी राहत असलेल्या घरमालक आणि सोसायटीतील रहिवाशांमध्ये पसरली आहे.
हे घरमालक आरोग्य कर्मचाऱ्यांना घर खाली करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे दिल्ली सरकार अशा घरमालकांवर कारवाई करणार आहे. साथीचा आजार कायद्याअंतर्गत पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
जे घरमालक आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोडण्यास भाग पाडत आहेत, त्यांच्यावर आता प्रशासन कारवाई करणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना कठीण परिस्थितीत अशा संकटांना समोरे जावे लागत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली होती.