नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कामगार आणि शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. कामगार मिळेल त्या वाहनाने आणि अगदी पायी चालत सुद्धा स्वतःच्या गावी निघाले आहेत. घरचा रस्ता धरलेल्या आणि तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या या कामगारांना त्यांच्या मोठमोठे उद्योगपती असलेल्या मालकांनीही वाऱ्यावर सोडून दिले आहे. बहुतेक कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसेही न मिळता रिकाम्या हाताने घरी परतावे लागले आहे. त्यांचे दोन वेळच्या खाण्या-पिण्याचे वांदे झाले आहेत. असे असताना दिल्लीच्या जवळील तिगीपूर या गावातील शेतकऱ्याने त्याच्या शेतावर काम करणाऱ्या मजुरांना विमानाने बिहारला पाठवण्याची व्यवस्था केली आहे.
पप्पन सिंह गेहलोत असे या दिलदार शेतकऱ्याचे नाव आहे. दिल्लीच्या बाहेरील भागातील तिगीपूर येथे या शेतकऱ्याचे शेत आहे. त्यांच्या शेतावर 27 वर्षांपासून बिहारहून वेगवेगळ्या कामांसाठी मजूर येतात. त्यांच्याकडे 48 मजूर यंदा काम करत होते. लॉकडाऊनआधीच्या आठवड्यात त्यातले बहुतेकजण निघून गेले. मात्र, दहा मजूर लॉकडाऊनमध्ये अडकले. आता मशरूमच्या शेतीचा हंगामही संपलेला असल्यामुळे त्यांना तेथे फारसे काम नाही. त्यांना आपापल्या घरी जायची ओढ लागली आहे. हे मजूर दिल्लीहून चालत किंवा बसमधल्या गर्दीत किंवा रेल्वेतून जाऊ नयेत, म्हणून त्यांच्या शेतकरी मालकाने त्यांची हवाईमार्गे बिहारला जाण्याची व्यवस्था स्वखर्चाने केली आहे. मालकाने एवढे मोठे मन दाखवल्याने मजूरही खूश आहेत.