नवी दिल्ली -विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसे राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे प्रमाण वाढू लागले आहे. विकास कामांवरून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. मुख्यमंत्री अरविंद आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. केजरीवाल यांनी एक व्हिडिओ जारी केला असून दिल्लीकरांच्या मेहनतीची अशी खिल्ली उडवणे गृहमंत्र्यांना शोभा देत नाही, असे म्हटले आहे.
मी गेल्या काही दिवसांपासून पाहत आहे की, अमित शाह आपल्या प्रचार सभेमध्ये दिल्लीकरांचा अपमान करत आहेत. दिल्लीकरांनी आपल्या मेहनतीने शाळा, रुग्णालय सुधारली आहेत. तुम्ही दिल्लीतील शाळांचा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अपमान केला. बरेच पालक त्यामुळे दुखावली आहेत. दिल्लीतील सरकारी शाळाचा निकाल 96 टक्के लागला आहे. एवढा चांगला निकाल आतापर्यंत कोणत्याच राज्यात लागला नाही. हे दिल्लीकरांच्या मेहनतीचे फळ आहे. मात्र, तुम्ही आपल्या भाषणातून त्याच्या मेहनतीचा अपमान केला. खरे तर तुम्ही आमच्याकडून प्रेरणा घेऊन हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शाळांचा दर्जा सुधारायला हवा, असे केजरीवाल यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.