नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषींनी फाशीवर स्थगिती आणण्यासाठी दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने दोषी पवन कुमारची 'क्युरेटिव' याचिका फेटळली आहे.
निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. दोषी अक्षयने 31 जानेवरीला पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली आहे. फेटाळण्यात आलेल्या पहिल्या याचिकेमध्ये संपूर्ण तथ्य नव्हते, असे त्याने याचिकेमध्ये म्हटले आहे. तर आज पुन्हा पवन गुप्ताने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे.
दरम्यान निर्भया प्रकरणातील दोषींना 3 मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने १७ फेब्रुवारीला ही तारीख जाहीर केली होती. त्यापूर्वी तीन वेळा संबंधित प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.