नवी दिल्ली -दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारासाठी तयार केलेल्या आम आदमी पक्षाच्या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांनी संबधीत गाण्यावर आक्षेप घेतला असून आपकडे 500 कोटी रुपये एवढी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
'आप'च्या प्रचारगीतामध्ये मनोज तिवारी, भाजपने मागितली 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई
दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारासाठी तयार केलेल्या आम आदमी पक्षाच्या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे.
आम आदमी पक्षाने प्रचारासाठी शनिवारी एक गाणे तयार केले. 'लगे रहो केजरीवाल' असे त्या गाण्याचे नाव आहे. रविवारी दुपारी हे गाणे पक्षाकडून जारी करण्यात आले. मनोज तिवारी यांच्या चित्रपटातील दृश्य एकत्र करत संबधीत गाणे तयार करण्यात आल्यामुळे त्यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला आहे.
केजरीवाल खोटे बोलण्याचा कारखाना चालवत आहेत. मात्र त्यांनी आता खोटे बोलण्याच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. स्व:ताच्या फायद्यासाठी याप्रकारे ते माझ्या प्रतिभेचा वापर करतील, असे वाटले नव्हते. प्रचंड मेहनत घेऊन मी अभिनय केला. मात्र, केजरीवाल यांनी कोणाचीही परवानगी न घेता चित्रपटातील दृश्याचा चुकीचा वापर केला आहे. त्यामुळे माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे, असे मनोज तिवारी यांनी म्हटले.