नवी दिल्ली - चोरांनी केलेल्या 'प्रतापा'चा अजब नमुना समोर आला आहे. चोरांनी राष्ट्रपती भवनाजवळील मदर तेरेसा क्रिसेंट रोडवरील चक्क पाण्याचे पाईप चोरून नेल्याची घटना घडली आहे. लाखो रुपयांच्या पाईपची चोरी करण्यासाठी चोर कंटेनर घेऊन आले होते. त्यांचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी ही पाईपलाईन मेरठमध्ये विकली होते. पोलीस हे पाईपलाईन पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
...चक्क राष्ट्रपती भवनासमोरून चोरले पाण्याच्या पाईपलाईनचे २१ पाईप्स जोर बागहून राष्ट्रपती भवनाकडे जाणारी पाईपलाईनच या चोरांनी पळवली. येथे सध्या नव्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. यासाठी राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 23 आणि 24 च्या परिसरात अनेक पाईप ठेवण्यात आले आहेत. मदर तेरेसा क्रिसेंट रोडवरील तब्बल 21 पाईपची एका रात्रीतच चोरी झाली. कंपनीचे मालक अरुण जैन यांनी या संपूर्ण प्रकरणाविषयी चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी प्राथमिक तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
सीसीटीव्हीच्या मदतीने पकडले गेले आरोपी
येथे व्हीआयपींचा वावर असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कंटनरमध्ये पाईप ठेवल्यानंतर हे चोर स्विफ्ट कारमध्ये बसून पळाले होते. या कारचा क्रमांक शोधल्यानंतर चोरांना पकडण्यात यश आले. अजय, मिथिलेश, राकेश तिवारी आणि गुड्डू खान अशी या चोरांची नावे आहेत. यापैकी अजय या चोरांचा म्होरक्या आहे. तर, राकेश हा कॅब चालक आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांची पोलीस कोठडीमध्ये चौकशी सुरू आहे.