नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्व पक्षांच्या प्रचारसभांचा धुरळा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीमधील पहिली सभा काल (सोमवार) पार पडली. तर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
मोदींची आज द्वारकामध्ये सभा होणार आहे, तर अमित शाह हे दिल्लीतील कैंट परिसर, पटेल नगर आणि तिमरपूरमध्ये सभा घेतील. दुसरीकडे, राहुल गांधी यांची संगम विहार येथे, तर प्रियंका गांधी यांची जंगपुरामध्ये सभा होणार आहे. मनमोहन सिंग यांची राजौरी गार्डन येथे सभा होणार आहे.
'आप' प्रसिद्ध करणार जाहीरनामा..
आम आदमी पक्ष आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. ३१ जानेवारीला भाजपने आपले 'संकल्प पत्र' जाहीर केले होते. तर, २ फेब्रुवारीला काँग्रेसनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. भाजपने आपल्या संकल्प पत्रामध्ये गरीबांना २ रूपये प्रति किलो दराने पीठ, तर महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी देण्याचे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे तसेच सत्तेमध्ये आल्यानंतर 6 महिन्यांच्या आतमध्ये जनलोकपाल विधेयक आणण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता 'आप'च्या जाहीरनाम्यामध्ये काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होईल, तर ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
हेही वाचा : 'भाजपने आपल्या पक्षाच नाव बदलून नथुराम गोडसे पक्ष असं ठेवावं'