नवी दिल्ली -जेईई आणि नीटच्या परीक्षांना उशीर झाल्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच राजकीय वातावरणही तापले आहे. काल(गुरुवार) विरोधी पक्षातील सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधी यांच्याबरोबर ऑनलाईन बैठक घेतली. केंद्र सरकारनेही परीक्षा सप्टेंबर महिन्यात नियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचे जाहीर केले आहे. कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात गोंधळ सुरू असताना अनेक तज्ज्ञांनी परीक्षा घेण्याच्या बाजूने मत मांडले आहे. जर परीक्षांना आणखी उशीर झाला तर लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आयआयटी दिल्लीचे संचालक प्रोफेसर व्ही. रामगोपाल राव यांनी व्यक्त केली आहे.
'आधीच शैक्षणिक वर्ष वायाला गेले असताना आणखी उशीर केला तर त्याचे विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होतील. परीक्षा आणखी काही दिवस लांबविल्या तर चालू शैक्षणिक वर्ष शून्य म्हणजेच पूर्णपणे वायाला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
'परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे आयआयटीचे विद्यार्थी आणि संस्थेच्या शैक्षणिक कॅलेंडरवर गंभीर परिणाम होतील. एकाच वेळी दोन बॅच आपण चालवू शकत नाही. लाखो विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक वर्ष झिरो ठरेल. आधीच आयआयटीचे शैक्षणिक वर्ष अनेक कार्यक्रमांनी व्यस्त असते. यात अजून दिरंगाई म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वायाला जाण्यात होईल', असे राव म्हणाले.