महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

१९६२ ची पुनरावृत्ती : भारत अन् इतर देशांवर हल्ला करण्यासाठी कोरोना महामारीचा चीनकडून गैरफायदा..

भारत आणि चीन यांच्यातील सध्याचा सीमेवरील तणाव हा नव्या कोरोनाविषाणुविरोधातील जागतिक युद्धाचा गैरफायदा घेण्यासाठी आणि अमेरिकेतील देशांतर्गत मुद्यांचा सीमेवरील परिस्थिती आपल्या बाजूला अनुकूल करण्यासाठी चिनी सरकारने रचलेली चतुर खेळी आहे, असे लष्करी आणि डावपेचात्मक तज्ञांचे मत आहे. ही खेळी सहा दशकांपूर्वीच्या चिनी धोरणाची तीव्र आठवण करून देणारी आहे जेव्हा क्यूबाच्या क्षेपणास्त्र संकटाचा फायदा घेऊन चिनने १९६२ मध्ये भारतावर हल्ला केला होता, ज्यामुळे दोन महासत्ता जवळपास आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आल्या होत्या.

Deja vu 1962: China exploiting global war against coronavirus to harass India, others
१९६२ ची पुनरावृत्ती : भारत अन् इतर देशांवर हल्ला करण्यासाठी कोरोना महामारीचा चीनकडून गैरफायदा..

By

Published : Jun 17, 2020, 3:04 PM IST

हैदराबाद - भारत आणि चीन यांच्यातील सध्याचा सीमेवरील तणाव हा नव्या कोरोनाविषाणुविरोधातील जागतिक युद्धाचा गैरफायदा घेण्यासाठी आणि अमेरिकेतील देशांतर्गत मुद्यांचा सीमेवरील परिस्थिती आपल्या बाजूला अनुकूल करण्यासाठी चिनी सरकारने रचलेली चतुर खेळी आहे, असे लष्करी आणि डावपेचात्मक तज्ञांचे मत आहे. ही खेळी सहा दशकांपूर्वीच्या चिनी धोरणाची तीव्र आठवण करून देणारी आहे. जेव्हा क्यूबाच्या क्षेपणास्त्र संकटाचा फायदा घेऊन चिनने १९६२ मध्ये भारतावर हल्ला केला होता, ज्यामुळे दोन महासत्ता जवळपास अण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आल्या होत्या.

१९६२ मध्ये काही काळापासून क्यूबन पेचप्रसंग धुमसत होता, ज्याची परिणती १६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सर्वंकष संघर्षात झाली. त्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे २० ऑक्टोबर १९६२ रोजी, अमेरिका आणि पूर्वाश्रमीचा सोव्हिएत रशिया जेव्हा क्यूबामध्ये सोव्हिएत क्षेपणास्त्राच्या तैनातीमुळे अभूतपूर्व संघर्षात गुंतले होते, चीनने भारतावर हल्ला केला होता. तेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत रशिया दोघेही १९६२ च्या भारत चीन युद्धात हस्तक्षेप करण्याच्या परिस्थितीत नव्हते.

२२ ऑक्टोबरला अमेरिकन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी क्यूबाची नाविक नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आणि दोन्ही महासत्तांमधील खडाजंगी चर्चेनंतर अखेरीस ती २१ नोव्हेंबर, १९६२ ला उठवण्यात आली. २० ऑक्टोबर, १९६२ ला म्हणजे त्याच सुमारास चीनने भारताविरूद्ध युद्ध सुरू केले आणि नोव्हेंबर १९६२ मध्ये आपली लष्करी उद्दिष्टे साध्य केल्यानंतर एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली.

१९ ऑक्टोबर, १९६२ ला चिनी पंतप्रधान चौ एन लाय यांनी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली जी २१ नोव्हेंबर, १९६२ पासून अंमलात आणली गेली. नेमके त्याच दिवशी अमेरिकेने क्यूबातील आपली नाविक नाकाबंदी औपचारिकरित्या उठवली होती.

नवी दिल्लीस्थित भारताचे माजी राजदूत विष्णुप्रकाश, जे शांघायमध्ये भारताचे वकिलही होते, त्यांनी सांगितले की, आगळिकीची वेळ ही फार महत्वाची असते. चीनची घुसखोरी, संघर्ष आणि भारताची केलेली मनुष्यहानी ही काही अपघाताने झालेली नाही किंवा स्थानिक संघर्षही तो नाही. या खेळीची वेळ, हल्ल्याचे प्रमाण आणि इतर अनेक घटकांमुळे निश्चितच ही एक नियोजनबद्ध अशी खेळी आहे. सर्वोच्च पातळीवरून संमती मिळाल्याशिवाय निश्चितच अशा घटना घडू शकत नाहीत, असे राजदूत विष्णुप्रकाश यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

दक्षिण कोरियात भारताचे माजी राजदूता आणि कॅनडात उच्चायुक्त राहिलेले माजी राजनैतिक अधिकारी विष्णुप्रकाश यांनी या वर्षीच्या सुरूवातीला कोविड-१९ जागतिक महामारीचा उद्रेक झाल्यानंतर चीनने जवळपास प्रत्येक शेजारी देशात घुसखोरी केली आहे. याकडे दिशानिर्देश केला. भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडचे जीओसी म्हणून लडाख प्रदेशात देशाच्या सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेले कर्नल दीपेंद्रसिंग हुडा सांगतात, की प्रत्येक देश जेव्हा एखादी योजना आखतो तेव्हा ती अमलात आणण्याच्या वेळेचा विचार करतो आणि चीनने कोविड-१९ संकटाकडे योग्य वेळ म्हणून पाहिले आहे.

प्रत्येक देश जेव्हा एखादी योजना आखतो तेव्हा वेळेचा विचार करतो आणि ही खूप मोठी महत्वाची कृती असते, ज्यामुळे अशा कोणत्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहेत की, ज्यांचा गैरफायदा घेता येईल, याकडे निश्चितच लक्ष दिले जाते, असे हुडा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. भारत कोरोना विषाणुशी आणि त्या महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मुद्यांशी लढण्यात गुंतला आहे. हे त्यांनी पाहिले. त्यामुळे ही वेळ योग्य संधी आहे, असा विचार त्यांन केला असावा, असे जनरल हुडा यांनी पुढे म्हटले.

प्रतिष्ठित फेलो आणि भारताचा आघाडीचा थिंक टँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या आण्विक आणि अंतराळ धोरण पुढाकार प्रमुख डॉ. राजेश्वरी राजगोपालन म्हणतात की गेल्या ५ ते ६ वर्षात चीन आपली लष्करी आणि डावपेचात्मक क्षमता वाढवत होता आणि शेजारी देशांशी असलेली सीमेवरील परिस्थिती बदलण्याची संधीच पाहत होता. ते याची योजना आखत होते, हे स्पष्ट आहे. ही काही एका रात्रीतून घडलेली गोष्ट नाही, असे राजेश्वरी राजगोपालन यांनी ईटीव्ही भारतला सांगितले. चिन विशेषतः उंचावरील भागात लष्कर आणि हवाई दलांच्या संयुक्त प्रात्यक्षिकांद्वारे आपल्या लष्कराच्या अनुभवाच्या अभावावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्या म्हणाल्या.

गेल्या ५ ते ७ वर्षांपासून आम्ही तिबेटच्या स्वायत्त क्षेत्रात तसेच भारत-चीन सीमावर्ती भागात पीएलएच्या कवायती पहात आलो आहोत. पीएलए आणि पीएलए हवाई दल यांच्या संयुक्त लष्करी प्रात्यक्षिके त्यांनी वाढवली असल्याचे आम्हाला आढळले आहे. विशेषतः अतिउंचीवरील भागांमध्ये कार्यचालनात्मक कार्यक्षमता यातील त्रुटी दूर करण्यासाठी आणि दोन्ही दलांनी अधिक समन्वयाने काम करण्यासाठी त्यांनी हे केले आहे, असे डॉ. राजेश्वरी यांनी नमूद केले.

यावर्षीच्या जानेवारीपासून चीनने प्रत्येक शेजारी देशाविरोधात भूमिका घेतली असून भारतालाही यातून त्यांनी सोडलेले नाही, असेही त्या म्हणाल्या. ते काही काळापासून याचे नियोजन करत आहेत, हे अगदी स्पष्ट आहे. जेव्हा संपूर्ण जग कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत गुंतले आहे, जो विषाणु प्रत्यक्षात चिनमधूनच जन्माला आला आहे, तेव्हा त्यांनी हीच योग्य वेळ आहे, असे पाहिले, असे डॉ. राजेश्वरी यांनी पुढे सांगितले.

गेल्या महिन्याच्या सुरूवातीला जेव्हा चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये पूर्व लडाखमध्ये चकमकी झाल्याचे व्हिडिओ समोर आले तेव्हापासून ही समस्या सुरू झाली. दोन्ही देशांनी नंतर अवजड शस्त्रे युद्भभूमीत हलवली आणि ताजी कुमकही पाठवली, मात्र राजनैतिक चॅनल्सच्या माध्यमातून तसेच दोन्ही देशांच्या सर्वोच्च लष्करी कमांडर्सच्या बोलण्यांतून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्नही केला. ६ जून रोजी दोन्ही देशांमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर बोलणी झाल्यानंतर, स्थानिक लष्करी कमांडर स्तरावर बोलणी झाली आणि समझोत्याची लाक्षणिक खूण म्हणून, दोन्ही देशांनी वादग्रस्त प्रदेशातून आपापली सैन्ये अडीच किलोमीटरपर्यंत मागे घेतली.

परंतु, भारतीय लष्कर आणि चिनी सैनिक यांच्यात सोमवारी रात्री जो हिंसक संघर्ष झाला तो या विश्वासवर्धक उपायांना मोठा झटका देणारा ठरला आहे. भारतीय लष्कराने एका कर्नलसह किमान २० जवान शहिद झाल्याचे मान्य केले आहे तर चीनने त्यांच्या हानीबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.

मंगळवारी रात्री उशिरा जारी केलेल्या एका निवेदनात, भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गलवान खोर्यातील जैसे थे स्थिती बदलण्याचा आणि ६ जूनला वरिष्ठ लष्करी कमांडर्समध्ये तयार झालेल्या सहमतीचा भंग केला आहे, असा आरोप चिनवर केला आहे.

भारतीय भूभाग थोडा थोडा कुरतडून बळकावण्याच्या चीनच्या धोरणाबद्दल लोकांनी टीका केली आहे. दोन पावले पुढे जायचे आणि एक पाऊल माघारी यायचे, ही चीनचे सर्वपरिचित असे डावपेच आहेत, असे चीनच्या धोरणाबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात विष्णुप्रकाश यांन सांगितले.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, जे २०१७ मध्ये चिनबरोबर उडालेल्या डोकलाम संघर्षाच्या वेळेस लष्करप्रमुख होते, त्यांनी चीनचे हे धोरण देशाच्या प्रादेशिक ऐक्याला सर्वात मोठा धोका आहे, असे सांगितले. तर राजदूत विष्णुप्रकाश यांनी सततचा विस्तारवाद यात चीन पूर्वीही तरबेज राहिला आहे, असे नमूद केले. चीन नव्याच प्रकारच्या राजनैतिक डावपेचांकडे वळला असून हे अत्यंत गैरवर्तन करणारे आणि आक्रमक आहे, असे ते म्हणाले.

दक्षिण चीन समुद्र प्रदेशातील त्यांच्या वर्तनाकडे पहा, तसेच ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांशीही त्यांचे वर्तन चांगले नाही, असे त्यांनी ईटीव्ही भारतला सांगितले.

अलिकडच्या काळातील चीनच्या विस्तारवादाच्या धोरणामुळे नुकसान झालेला भारत हा एकमेव शेजारी देश नाही, असे डावपेचात्मक तज्ञ सांगतात. त्यांना (चिनी नेतृत्व) असे वाटते की ते खूप सामर्थ्यवान झाले आहेत आणि अमेरिका कमजोर झाली आहे, क्षी जिनपिंग यांचाही यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या वर्तनात एकप्रकारचा अतिआत्मविश्वास आणि उद्धटपणा आला आहे, असे ओआरएफच्या डॉ. राजेश्वरी राजगोपालन नमूद करतात.

चिनी धोरणांनी तैवान, व्हिएटनाम, मलेशिया आणि इंडोनेशिया यासह इतरही अनेक देशांना वर्षाच्या सुरूवातीपासूनच लक्ष्य केले असल्याने चीनला याच्या प्रतिकूल प्रतिक्रियेचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. प्रत्येक देश चीनच्या दादागिरीविरोधात जागा झाला आहे आणि त्यामुळे चिनी साहसवादाला मागे ढकलले जाईल, असे त्यांनी ईटीव्ही भारतला सांगितले.

- कृष्णानंद त्रिपाठी.

ABOUT THE AUTHOR

...view details