देहराडून - देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभाग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. महानगरपालिकेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्ण सापडलेल्या परिसरांसह शहरे आणि गावांचे निर्जंतुकीकरण करत आहेत. मात्र, देहराडून महानगरपालिकेला आपल्या स्वच्छता कर्मचाऱयांची काळजी नसल्याचे दिसते. येथील स्वच्छता कर्मचाऱयांना अतिशय निकृष्ट दर्जाचे मास्क देण्यात आले असून हातमोजे आणि सॅनिटायझर दिलेही गेले नाही.
तरीही हे 1 हजार 895 स्वच्छता कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करत आहेत. हे कर्मचारी दररोज शहरातील प्रत्येक भाग स्वच्छ करुन निर्जंतूक करत आहेत. राज्य सरकार माध्यमांना तर सांगत आहेत की, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे ते कमीच आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेची काळजी सरकार आणि प्रशासन घेताना दिसत नाही.