पंचकुला- 'आता पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरविषयीच असेल,' अशी गर्जना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केली आहे. ते हरियाणातील पंचकुला येथे एका सभेमध्ये बोलत होते.
'आपला शेजारी पाकिस्तान जगभरातील देशांकडे कटोरा घेऊन फिरत आहे. मात्र, आतापर्यंत त्यांना केवळ निराशाच मिळाली आहे. पाकिस्तान जेव्हा दहशतवादाचा मार्ग सोडून देईल, तेव्हाच त्यांच्याशी चर्चा करणे शक्य आहे. आता पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरविषयीच असेल,' असे राजनाथ म्हणाले.
'पाकिस्तानी पंतप्रधान म्हणत आहेत की, भारत आता बालाकोटहूनही मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे. याचा अर्थ असा आहे की, 'भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला,' हे पाकिस्तानला मान्य आहे,' असे सिंह म्हणाले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हा लोकप्रतिनिधींना निवडणुकीवेळी जाहीरनाम्यामधून दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व करण्याचे आदेश दिले आहेत. हाच आमचा संकल्प आहे,' असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने आर्टिकल ३७० रद्द करत जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. या निर्णयाविरोधात पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवरून समर्थन मिळवण्यासाठी जंगजंग पछाडत आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिलेला नाही.