अयोध्या (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील ‘राम मंदिर भूमीपूजन उत्सव’ साजरा करण्यासाठी 'दीपोत्सव' आयोजित केला आहे. राज्यातील सर्व मंदिरांना दिवाळीप्रमाणे रोषणाई करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व मंदिरांमध्ये दिव्यांची आरास करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आदित्यनाथ यांनी 25 जुलैला अयोध्येतील रामजन्मभूमी स्थानाला भेट दिली होती. त्यावेळी, त्यांच्या हस्ते रामजन्मभूमी मंदिरात लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती नव्या आसनांवर ठेवण्यात आल्या.
राम मंदिरासाठी कोरलेल्या दगडांची पाहणी केल्यानंतर योगींनी विश्व हिंदू परिषदेच्या मुख्यालयात कारसेवक पुरम येथे पुरोहित आणि राम मंदिर ट्रस्टच्या सदस्यांची बैठक घेतली. ‘अखेर रामजन्मभूमीवर राम मंदिर स्थापनेचा हा शुभ मुहूर्त 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आला आहे. म्हणूनच, हा प्रसंग दिवाळीप्रमाणे साजरा केला पाहिजे,’ असे आदित्यनाथ यांनी सर्व पुरोहितांना सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांनी 'भूमिपूजना'च्या एक दिवस आधीपासून 'दीपोत्सव' आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 आणि 5 ऑगस्टला अयोध्येतील सर्व मंदिरे आणि मठ दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघतील.
3 ऑगस्टला धार्मिक विधी
राम मंदिरासाठी 'भूमिपूजना'च्या दोन दिवसाआधी 3 ऑगस्टपासून धार्मिक विधी सुरू होतील. त्याशिवाय शहरात रामायणाचे पठणही होणार आहे.