हैदराबाद- वारंगलमध्ये एका विहिरीत नऊ जणांचे मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना पुढे आली होती. यापैकी सहा जण हे एकाच कुटुंबातील होते. मात्र ही घटना आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतांपैकी सात जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विहिरीत ढकलण्यात आले होते, अशी माहिती फॉरेन्सिक तज्ज्ञाने दिली आहे.
तेलंगाणाच्या वारांगल परिसरात गुरुवारी चार आणि शुक्रवारी पाच मृतदेह विहिरीतून सापडले होते. या प्रकरणातील हत्या किंवा आत्महत्येचे गूढ अजूनही उकललेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग दिला असून फॉरेन्सिक विश्लेषणही सुरू आहे. या घटनास्थळाला भेट देणाऱ्या फॉरेन्सिक तज्ञाने सांगितले की, नऊ जणांपैकी सात जणांच्या अंगावर जखम झाली होती आणि त्यांना खेचून विहिरीत फेकले गेले आहे.
फॉरेन्सिक अहवाल दहा दिवसांत अपेक्षित असल्याची माहिती फॉरेन्सिक तज्ज्ञाने रविवारी पत्रकारांना दिली. घटनास्थळी भेट दिल्यानंतर हे लक्षात येते की ही आत्महत्या नव्हती. पुढे ते म्हणाले, की आम्ही त्यांचे सर्व अवयव ताब्यात घेतले आहेत. मृतांच्या शरीरावरील जखमा बघून या गुन्ह्यात दोन किंवा तीन जणांचा सहभाग असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी आत्महत्या केली असे वाटत नाही. त्यांना विहिरीत फेकण्यात आल्यासारखे दिसून येत आहे. या मृतदेहापैकी छोट्या मुलाच्या अंगावर कोणतीही जखम नाही. तसेच त्यांना विषबाधा झाली होती की नाही, या तपासणीसाठी आम्ही फॉरेन्सिक अहवालाची वाट बघत असल्याचे फॉरेन्सिक तज्ञाने सांगितले.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी कुटुंबातील प्रमुख, पत्नी, मुलगी आणि तीन वर्षाचा नातू यांचे मृतदेह विहिरीत तरंगताना मच्छिमारांना सापडले होते. तर शुक्रवारी सकाळीदेखील आणखी काही मृतदेह तरंगताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी हे मृतदेह बाहेर काढले होते.