नवी दिल्ली - संपूर्ण देश जरी गांधीजींच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त उत्साही असला, तरी गांधीजींचे मृत्यूबद्दलचे विचार जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गांधींबद्दल बोलला किंवा लिहिला गेला नाही असा एकही विषय नसेल. किंवा मग त्यांनी एखाद्या गोष्टीबद्दल विचार केला नाही किंवा बोलले अथवा लिहिले नाही असे कधी झाले नसेल. अगदी स्वतःच्या मृत्यूबाबतही त्यांनी अगदी विस्तारपूर्वक विचार केला आहे.
आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच, गांधीजींनी निर्भयतेवर भरपूर जोर दिला. या निर्भयतेनेच त्यांना सर्व प्रकारच्या भीतींपासून मुक्त केले. म्हणूनच ते मृत्यूच्या भीतीतून स्वत: ला मुक्त करू शकले.
'सत्याग्रह इन साऊथ आफ्रिका' या त्यांच्या पुस्तकात गांधीजी लिहितात, की प्रत्येकाला विधात्याबद्दल भीतीयुक्त आदर असायला हवा. जन्म आणि मृत्यूमधील संबंधांबद्दल बोलताना ते लिहितात, की जेव्हा मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ येईल, तेव्हा त्याचे असे स्वागत केले पाहिजे, जणू युगानुयुगे न भेटलेल्या मित्राला आपण भेटत आहोत. 'यंग इंडिया' मध्ये, ३० डिसेंबर १९२६ रोजी लिहिलेल्या लेखात ते म्हणतात, मृत्यू हा केवळ चांगला मित्र नाही, तर अतिशय प्रिय मित्र आहे.
हेही वाचा : महात्मा गांधी : एक व्यावहारिक आदर्शवादी
त्यामुळेच, गांधीजींसाठी मृत्यू हा तेवढा भीतीदायक नव्हता. त्याचप्रमाणे, त्यांनी कुठेतरी म्हटले आहे, की कोणत्याही वेळी मृत्यू येणे हे भाग्याची गोष्ट आहे, मात्र सत्याचे ध्येय गाठण्यासाठी मरण पावलेल्या योद्ध्यासाठी मृत्यू म्हणजे अहोभाग्य होय. इथे सत्याचा आणि निर्भयपणाचा अगदी घनिष्ठ संबंध गांधीजींनी दाखवला आहे.
हेच कारण आहे, की गांधीजी आपले 'सत्य' वाचवण्यासाठी आपले बलिदान देखील देण्यास सदैव तत्पर राहिले. आचार्य जे. बी. कृपलानी, ज्यांना गांधीजींच्या रणनीतीची अगदी जवळून माहिती आहे, ते लिहितात की गांधीजींना जर कधी हे समजले की शहीद होण्याच्या संधी फारच कमी झाल्या आहेत, तेव्हा ते नवीन परिस्थितीचा शोध घेण्यात व्यस्त होतील.
३० जानेवारी १९४८ च्या आधीही गांधीजींच्या हत्येचे बरेच प्रयत्न झाले. दक्षिण आफ्रिकेमध्येही त्यांनी एका ब्रिटिश मित्राची सुटका केल्यामुळे त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. १९३४ नंतर तर त्यांच्या जीवाला कायम धोका होता. त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच त्यांनी हे मान्य केले होते, की भारताला फक्त त्यांचीच नाही तर त्यांच्या प्राणांचीही गरज आहे.