दरभंगा (बिहार) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सर्वत्रच 24 तास खडा पहारा देताना दिसतात. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असले तरी, लोकांच्या समस्या ते जाणतात. कामाला प्रमाण मानून कार्य करणार्या पोलिसांच्या अंतरमनातही एक भावना असते.. असेच काहीसे दृश्य दरभंगा येथे दिसून आले.
सकाळी काठी उगारणारे पोलीसकाका संध्याकाळी दारात केक घेऊन येतात तेव्हा.. मुलाचा वाढदिवस असल्याने वडील त्याला केक आणण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवत, लॉकडाऊनचे कारण सांगून घरी परत पाठवले. त्यामुळे कुटुंबीयांसह 'बर्थडे बॉयही' नाराज झाला. पण, आता कोणीच काही करू शकत नव्हते. मात्र, संध्याकाळी तेच पोलीसकाका ज्यांनी सकाळी काठी उगारत घरी पाठवले होते, ते केक घेऊन दारात उभे राहिले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि पोलिसांप्रती आदराची भावना निर्माण झाली.
सकाळच्या सुमारास हा प्रकार पोलिसांकडून अधीक्षक बाबुराम यांना समजला होता. तेव्हा त्यांनी मुलाला 'सरप्राईज' देण्याचे ठरवले. त्यांनी कर्तव्यावरील ठाणेदार जयनंद यांना एक मोठा केक, चॉकलेट आणि गिफ्ट घेऊन मुलाच्या घरी जाण्यास सांगितले. त्यावर सकाळी अडवणूक करणारे पोलीस अशाप्रकारे प्रकट झाल्याने सर्वांनाचा आश्चर्य वाटले. पोलिसांनी कुटुंबीयांसह मुलाचा वाढदिवस साजरा करत शुभेच्छा दिल्या. परंतु, सुरक्षित अंतर राखण्याचीही खबरदारी सर्वांनी घेतली.
दरभंगा शहरातील लहेरियासराय पोलीस ठाण्याच्या भागात हा सर्वप्रकार घडला. येथील बँकीग वसाहतीत राहणाऱ्या अंकुर कुमार गुप्ता यांचा मुलगा वेद गुप्ता याचा कोरोनाच्या काळात आठवणीत राहणारा वाढदिवस साजरा झाला.