नवी दिल्ली - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभा सदस्य डी. राजा यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याची माहिती सुधाकर रेड्डी यांनी दिली आहे. याचबरोबर कन्हैया कुमार यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी समितीवर निवड करण्यात आली आहे.
डी. राजा हे तमिळनाडूमधील राज्यसभेचे सदस्य आहेत. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) 1994 पासून राष्ट्रीय सचिव होते. राष्ट्रीय परिषद बैठकीमध्ये त्यांच्या महासचिवपदी नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्यानंतर आज औपचारीक घोषणा करण्यात आली आहे.
डी. राजा हे कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वस्थानी निवडले गेलेले पहिले दलीत नेते आहेत. कम्युनिस्ट पक्षावर आतापर्यंत असा आरोप केला जात होता की, त्यांचे नेतृत्व उच्चभ्रू समुहातील नेतेच करतात. मात्र, राजा यांच्या रुपात कम्युनिस्ट पक्षाने आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.
2019 लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर पक्षाचे माहासचिव रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, रेड्डी यांनी आपण स्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याचे म्हटले होते.