अहमदाबाद- गुजरातच्या उंबरठ्यावर संकट बनून उभे राहिलेले "वायू" चक्रीवादळ आता गुजरातला धडकणार नसल्याची माहिती भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. आता हे चक्रीवादळ गुजरात राज्याला न धडकात वेरावल, पोरबंदर आणि द्वारका किनाऱ्याजवळील समुद्रातूनच पुढे जाईल.
गुजरातचा धोका टळला, 'वायू'ने दिशा बदलली
गुजरातमध्ये किनारी प्रदेशात वादळासह प्रचंड पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी गुजरातसाठी जारी करण्यात आलेला सतर्कतेचा इशाारा कायम ठेवण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दहशत निर्माण करणारे वायू चक्रीवादळ आज गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवली जात होती. गुजरात किनाऱ्यावर त्याची चिन्हेही दिसत होती. प्रचंड वारे आणि खवळलेल्या समुद्रामुळे गुजरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, हवामान खात्याने दिलेल्या सुधारीत माहितीनुसार आता या वादळाचा धोका टळला आहे. या चक्रीवादळाने आपला मार्ग बदलला असून गुजरातच्या किनाऱ्यावर थेट न धडकता केवळ पोरबंदर, द्वारका आणि त्यालगतच्या काही प्रदेशातून पुढे जाणार आहे. त्यामुळे गुजरात किनारपट्टीचा धोका टळला आहे.
दरम्यान, असे असले तरी गुजरातमध्ये किनारी प्रदेशात वादळासह प्रचंड पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी गुजरातमध्ये जारी करण्यात आलेला सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. हे वादळ आता समुद्रातूनच पुढे सरकत जाणार आहे.