महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निवार चक्रीवादळाची तीव्रता कमी, पूर्णपणे नष्ट होण्यास लागणार १२ तास - निवार चक्रीवादळ लाईव्ह

Cyclone Nivar LIVE Updates
निवार चक्रीवादळ तामिळनाडू आणि पद्दुचेरीच्या किनाऱ्यापासून पुढे; पाहा LIVE अपडेट्स..

By

Published : Nov 26, 2020, 9:40 AM IST

Updated : Nov 26, 2020, 10:46 PM IST

17:58 November 26

पुद्दुचेरीमध्ये निवार चक्रीवादळामुळे नुकसान

पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी निवार चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागांना भेटी दिल्या.  

16:34 November 26

सरकारच्या नाकर्तेपणाचा पीडितांना फटका - एम. के स्टॅलिन

निवार चक्रीवादळानंतर सुरू असलेल्या मदतकार्यावरून द्रमुकचे नेते एम. के स्टॅलिन यांनी सत्ताधारी अण्णा द्रमुक सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सरकारला २०१५ साली आलेल्या पुराची आठवण करून दिली. सरकार २०१५ च्या पुरापासून सरकार काहीही शिकलेलं दिसत नाही, हे आत्ता आलेल्या वादळातून दिसून येत आहे. सरकारच्या नाकर्तेपणाचा पीडितांना फटका बसला असून सरकारने नागरिकांना प्रत्येकी ५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे ते म्हणाले.    

14:54 November 26

चेन्नई शहरात मुसळधार पाऊस

निवार चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील चेन्नई शहरात विविध भागांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी पाऊस झालेल्या भागांत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

13:04 November 26

चक्रीवादळाची तीव्रता झाली कमी..

चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, पुढील सहा तासांमध्ये ती आणखी कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. तसेच, हे चक्रीवादळ पूर्णपणे जाण्यासाठी आणखी १२ तास लागण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

13:02 November 26

चक्रीवादळाचे आतापर्यंत तीन बळी, तर तीन जखमी..

निवार चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला असून, तीन जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच सुमारे १०० झोपड्यांचे नुकसान झाले असून, ३८० झाडं कोसळल्याची माहिती तामिळनाडूचे अतिरिक्त मुख्य सचिव अतुल्य मिश्रा यांनी दिली आहे.

11:29 November 26

अमित शाहांनी घेतला परिस्थितीचा आढावा..

"तामिळनाडू आणि पद्दुचेरीमधील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. तसेच, मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांच्याही संपर्कात आम्ही असून, केंद्राकडून हवी ती मदत पुरवली जात आहे. तसेच एनडीआरएफची पथकेही राज्यात तैनात करण्यात आली आहेत" अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिली.

11:02 November 26

पद्दुचेरीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिली भेट..

मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी पद्दुचेरीमधील चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाला भेट दिली. अशा प्रकारचा पाऊस यापूर्वी परिसरात झाला नव्हता. सुदैवाने अद्याप कोणत्याही जीवितहानीची नोंद झाली नाही. तसेच, काही भागात वीज पुरवठा थांबला आहे, तो येत्या १२ तासांमध्ये पूर्ववत होईल असेही त्यांनी सांगितले.

09:31 November 26

तामिळनाडू आणि पद्दुचेरीच्या किनाऱ्यावरुन पुढे..

निवार चक्रीवादळाने तामिळनाडू आणि पद्दुचेरीचा किनारी भाग ओलांडला असून, सध्या वाऱ्याचा वेग १२० ते १३० किमी प्रतितास एवढा आहे. तामिळनाडूच्या कड्डलोर जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे काही झाडे उन्मळून पडली.

09:29 November 26

अद्याप धोका टळला नाही; हवामान खात्याचा इशारा..

किनाऱ्यावर धडकल्यानंतर निवार चक्रीवादळ कमजोर पडले असले, तरीही उत्तरपूर्व भागातील वाऱ्याची गती अजूनही १०० किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक आहे. येत्या काही तासांमध्ये ही कमी होऊन ६५-७५ किलोमीटर प्रतितास होईल, मात्र वादळाचा काही भाग अजूनही पाण्यावर असल्यामुळे धोका टळला नाहीये असे हवामान खात्याने स्पष्ट केले.

09:26 November 26

निवार चक्रीवादळ तामिळनाडू आणि पद्दुचेरीच्या किनाऱ्यापासून पुढे..

गुरुवारी रात्री निवार चक्रीवादळ चेन्नईच्या किनाऱ्याला धडकले. त्यामुळे तामिळनाडू आणि पद्दुचेरीच्या काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पहायला मिळाला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन तासांमध्ये हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने जाईल.

Last Updated : Nov 26, 2020, 10:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details